January 27, 2025

Vishwakarma University – Centre of Communication for Development

An Initiative of Department of Journalism and Mass Communication, Vishwakarma University, Pune

पत्रकारितेचे तळागळातील नीतू सिंग कनेक्शन

pp
लेखक : प्रा. अभिषेक भोसले

२०२० साठीचा चमेली देवी जैन उत्कृष्ट महिला माध्यमकर्मी पुरस्कार “गाव कनेक्शन’ या ग्रामीण भारताचे वार्तांकन करणाऱ्या माध्यमसंस्थेच्या नीतू सिंग यांना प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी समांतर माध्यमात काम करणाऱ्या नीतू सिंग यांची निवड अनेक पातळ्यांवर महत्वाची आहे.

द मीडिया फाउंडेशन कडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या चमेली देवी जैन उत्कृष्ट महिला माध्यमकर्मी पुरस्काराचे वितरण नुकतेच झाले. २०२० साठीचा चमेली देवी जैन उत्कृष्ट महिला माध्यमकर्मी पुरस्कार “गाव कनेक्शन’ या ग्रामीण भारताचे वार्तांकन करणाऱ्या माध्यमसंस्थेच्या नीतू सिंग यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी समांतर माध्यमात काम करणाऱ्या नीतू सिंग यांची निवड अनेक पातळ्यांवर महत्वाची आहे.

सध्याची माध्यमांची स्थिती पाहता अनेक वेळा प्रेक्षक आणि वाचक विचारतात, मग आम्ही काय वाचायचं आणि पहायचं? त्यातही ग्रामीण भारतातील विषय मुख्य प्रवाहातील माध्यमात क्वचितच वाचायला आणि पाहायला मिळतात. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये ग्रामीण भारताचं प्रतिबिंब म्हणावं तेवढ दिसत नाही हा आता काही नवीन चर्चिण्याचा मुद्दा नाही. त्यातूनच ग्रामीण भारताचे स्वतंत्र्य वार्तांकन करतील असे समांतर प्रयोग माध्यमात सुरु झाले. त्यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे “गाव कनेक्शन’. याच गाव कनेक्शनच्या नीतू सिंग यांना या वर्षीचा मानाचा चमेली देवी जैन उत्कृष्ट महिला माध्यमकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
चमेली देवी जैन यांच्या नावाने १९८१ पासून हा पुरस्कार दिला जातो. समाजिक जाणिवेसह, पत्रकारितेप्रतीचे समर्पण आणि निष्ठा तसेच धैर्याने काम करणाऱ्या महिला माध्यमकर्मींना हा पुरस्कार दिला जातो.आतापर्यंत नीरजा चौधरी, तिस्ता सेटलवाड, बरखा दत्त, सुनिता नारायण, महाराष्ट्रातील अलका धुपकर, प्रियंका दुबे, अरफा खानुम, रोहिणी मोहन इ. महत्त्वाच्या माध्यमकर्मीना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आले. यातील अनेक पत्रकार ह्या मुख्यप्रवाहतील माध्यमात काम करणाऱ्या होत्या. त्यामुळं समांतर माध्यमात काम करणाऱ्या नीतू सिंग यांना हा पुरस्कार मिळण याचं वेगळा महत्व आहे.

गाव कनेक्शन ही ग्रामीण भारताचे सखोल आणि प्रयोगशील वार्तांकन करणारी माध्यम संस्था आहे. तसंच यातील बातम्या आणि वार्तांकन हे ग्रामीण  वाचक आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेऊन करण्यात येतं. सर्वसाधारणपणे मुख्य प्रवाहातील बातम्या ह्या शहरी वाचक आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेऊन करण्यात येतात. त्यातले एक महत्वाच कारण म्हणजे बातम्यांसोबत येणाऱ्या जाहिरातींचा ग्राहक हा बहुतांश शहरी असतो. अशा शहरकेंद्री माध्यम अवकाशामध्ये गाव कनेक्शन सारखे प्रयोग ग्रामीण भारताचे शक्य होईल तेवढे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहेत. शक्य तेवढ्या  रिसोर्सेसमध्ये ही माध्यमसंस्था दर्जेदार ग्राउंड रिपोर्टिंग करत आहे. तसेच ग्रामीण भारतातील प्रश्नांना वाचा फोडणारा दबावगट म्हणूनही गाव कनेक्शनकडं पाहिलं जातं. सध्या तरी गाव कनेक्शनने उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील ग्रामीण भागांमध्ये आपला प्रभाव सिद्ध केला आहे. ग्रामीण भारताचे ग्राउंड रिपोर्टिंग हे गाव कनेक्शनचे बलस्थान आहे. गाव कनेक्शन फक्त ग्रामीण भारताचं वार्तांकन करत नाही तर ग्रामीण भारतातील नागरिकांचा माध्यमातील सहभाग वाढविण्याचा प्रयत्नही करत आहे. तसचं त्यांच्यापर्यंत बातम्या पोहचाविण्यासाठीची नवीन प्रयोगशीलताही आत्मसाथ करून ग्रामीण वार्तांकनाची नवीन शैली माध्यमात रुजविण्याच्या दृष्टीने गाव कनेक्शनचे महत्व आहे. 

नीतू सिंग यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे गाव कनेक्शन सारख्या समांतर माध्यमांचे महत्व अधोरेखित झाले आहे. तसाच ग्राउंड रिपोर्टिंगची जी पोकळी माध्यमात निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याचे काम गाव कनेक्शन सारख्या संस्था करत आहेत. ज्या वाचक, प्रेक्षकांना माध्यमातील सध्याच्या परीस्थितीमध्ये काय पहायचं आणि वाचायचं हा प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी गाव कनेक्शनसारखे प्रयोग पर्याय असू शकतात.

ग्रामीण भागातील स्त्रियांच्या जगण्याचे वार्तांकन करण्यासाठी नीतू सिंग यांना एकमताने २०२० साठीचा चमेली देवी जैन उत्कृष्ट महिला माध्यमकर्मी पुरस्कार देण्यात आला. महिला सबलीकरण, लैंगिक हिंसाचार आणि दलितांवरील अत्याचारांवर नीतू सिंग या सातत्याने वार्तांकन करत आहेत.  ज्या वार्तांकनासाठी नीतू सिंग यांना हा पुरस्कार मिळाला त्यातील “बलात्कारानंतर’ ( मुळ इंग्रजी After the Rape) हे वार्तांकन महत्वाचे आहे.
 
बातम्यांच्या हेडलाईन्स न बनलेल्या ग्रामीण भागातील बलात्कार पीडितांच्या बलात्कारानंतरच्या खडतर आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न नीतू सिंग यांनी केला होता. गाव कनेक्शनच्या संकेतस्थळावर हे वार्तांकन आपण वाचू शकता. बाराव्या वर्षी बलात्कारामुळे माता बनलेली पिडिता, बलात्कारानंतर कुटुंबांनेच वाळीत टाकलेल्या पिडितांच्या जगण्याला वाचा फोडण्याचे काम नीतू सिंगने केले आहे. ह्या सर्व केसेस ग्रामीण भारतातील आहेतच आणि या सर्व पीडिता ह्या दलित, अल्पसंख्यांक समाजातील असल्यामुळे त्या कधीच बातमी आणि हॅशटॅग बनल्या नाहीत. बातमी बनलेल्या पीडितांचे त्या घटनेनंतरचे आयुष्य माध्यमात येत नाही. नीतू सिंग यांचे वार्तांकन म्हणजे बलात्काराच्या केसेसचे वार्तांकन कसे करावे याचा संवेदनशील परिपाठ आहे.
 
नीतू सिंगसाठी देखील हा प्रवास खडतर होताच. समांतर माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना अतिशय मर्यादित रिसोर्सेसमध्ये काम करावं लागतं. नीतू सिंग यांच्याशी हा पुरस्कार मिळल्यानंतर बोलताना पैसे वाचविण्यासाठी पायी जाऊन कराव्या लागलेल्या वार्तांकनाच्या आठवणी त्या सांगत होत्या. कमी रिसोर्सेसमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना जास्तीत जास्त कौशल्ये आत्मसात करावी लागतात. म्हणजे वार्तांकन करण्यापासून ते त्यांचं संपादन आणि दृकश्राव्य स्टोरीमध्ये व्हिडिओ एडिटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी स्वत:ला करता येणं गरजेचं असतं.  कमीत कमी मनुष्यबळांमध्ये जास्तीत जास्त काम करावं लागतं. कामाचा दर्जाही टिकवावा लागतो. खूप पैसा मिळतो असंही नाही, त्यामुळं उदरनिर्वाहाचा प्रश्न आहेच.  पण या सगळ्यात तुमची पत्रकारिता, आवाज नसलेल्या समूहांचे प्रश्न मांडण्याची तळमळ तुम्हाला पत्रकार म्हणून जिवंत ठेवते असं नीतू सिंग सांगतात.
 
नीतू सिंग यांना मिळालेला पुरस्कार हा तळागाळातील लोकांचे प्रश्न आपल्या पत्रकारितेतून मांडू इच्छिणाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणारा आहे. अशी पत्रकारिताच सध्याच्या काळातील लोकशाहीमधील माध्यमांचे महत्व अधोरेखित करीत राहणार आहे. तळागाळातील ग्राउंड रिपोर्टिंग जिवंत ठेवणार आहे. त्यामुळं गाव कनेक्शनसारख्या माध्यमसंस्था वाढल्या पाहिजे. त्यातून अनेक नीतू सिंग तयार होण्याच्या शक्यता आहेत, ज्या तळागळातील समूहांपर्यंत पोहचून त्यांचा आवाज बनू शकतील. 
(साभार : रसिक, दै. दिव्यमराठी)
 

(लेखक प्रा. अभिषेक भोसले, पुण्यातील विश्वकर्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जन संज्ञापन विभागात व्याख्याते आहेत)

email – abhishek.bhosale@vupune.ac.in