December 22, 2024

Vishwakarma University – Centre of Communication for Development

An Initiative of Department of Journalism and Mass Communication, Vishwakarma University, Pune

टेरेसवर फुलतोय घरासाठीचा भाजीपाला !

खर्चामध्ये होतेय बचत; कोरोनामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टळते

पुणे : चार जणांच्या कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला फ्लॅटच्या टेरेसवर पिकवला तर… एरवी अशक्य वाटणारी ही गोष्ट सिंहगड रस्त्यावरील धायरीमध्ये साकारली आहे. मनीषा तावरे यांच्याकडे भाजीपाला इतका पिकतो की, आता त्यांना तो विकत घेण्याची गरजच भासत नाही. त्यामुळे त्यांची परसबाग पाहण्यासाठी नागरिक तेथे भेट देऊ लागले आहेत. लॉकडाउनमुळे टेरेसवर भाजीपाला पिकविण्याची ‘क्रेझ’ अजूनही कायम आहे.

कोरोनाची दुसरी लाट राज्यात ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती आहेच. या पार्श्वभूमीवर भाजी मंडई आणि बाजारात जाणे टाळण्यासाठी लॉकडाउनमध्ये अनेक महिलांनी घरच्याघरी भाज्यांची बाग तयार करण्यास सुरवात केली आहे. तावरे म्हणाल्या, ‘‘गेल्यावर्षी लॉकडाउन लागला. घरातील कामे झाली की, वेळ असायचा. त्यावेळी काय काम करायचे, याचा प्रश्न असायचा. तेव्हा टेरेसवर भाजीपाला पिकविण्याची कल्पना सुचली. थोडी माहिती घेतली आणि पतीच्या मदतीने बाग तयार केली. रंगांच्या रिकाम्या डब्यांत भाज्यांची रोपे लावली. त्यातून टोमॅटो, भेंडी, गवार, वांगी, कारले, दोडके, घोसाळे, दुधी भोपळा, भोपळा आदी विविध फळभाज्या तर कडीपत्ता, कोथिंबीर, मिरच्याही याच बागेतून मिळतात.’’ सुमारे दीड वर्षांत फुललेल्या या बागेमुळे भाज्यांच्याबाबत आम्ही स्वयंपूर्ण झालो आहेत. लॉकडाउनमुळे आता घरीच भाजी उपलब्ध होत असल्यामुळे खर्च वाचतो आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याची वेळ येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

येवलेवाडीतील स्नेहल खेरडे यांनीही सदनिकेत फुलविलेल्या बागेत भाजीपाला लावला आहे. त्यातून त्यांना मिरच्या, कडीपत्ता, पुदीना, मेथी, शेपू, भेंडी आदी भाजीपाला मिळतो. भाजीपाल्याची रोपे त्यांनी तेलाचे ड्रम व छोट्या बादल्यांना व्यवस्थित आकार देऊन त्यात लावली आहेत. कोरोनाच्या काळात चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रिय फळ आणि भाज्यांचा आहार मिळणे आवश्यक आहे. घरीच सेंद्रिय आणि ताजी भाजी मिळाली की बाजारात गर्दीच्या ठिकाणी जायची गरज पडत नाही, असे खेरडे यांनी सांगितले. भाजीपाल्यासोबतच औषधी वनस्पती, फुलांची झाडेही त्यांनी लावली आहेत.

केळी, कांद्यापासून भाज्यांसाठी टॉनिक

घरातील बागेत भाजीपाला बहरण्यासाठी खत आणि पोषक पाणी आवश्यक असते. ते घरच्या घरी तयार करता येते, असे शिक्षिका असलेल्या वैशाली पठारे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘केळीची साले पाण्यात तीन ते चार दिवस भिजून ठेवायची. त्यानंतर साली बाहेर काढून ते पाणी झाडांना वापरता येते. कारण, ते पोषक ठरते. ते आठ दिवस टिकते. तसेच केळीच्या सालीचे बारीक तुकडे करून झाडाच्या मातीमध्ये मिसळावीत. या खतामुळे झाडांना चांगले पोषण मिळते. कांद्याच्या साली पाण्यात तीन दिवस भिजून ठेवाव्यात. त्यानंतर त्या बाहेर काढून पाणी झाडांना टाकता येते.’’

Pratiksha Jadhav

TY-Department of Journalism and Mass Communication

Vishwakarma University, Pune.